Sunday, 28 July 2019

शालेय परिवहन समिती सहविचार सभा


शालेय परिवहन समिती सहविचार सभा

शिरपूर येथील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे
शालेय परिवहन समिती सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप बोरसे,विद्यार्थी वाहतूक संघटनेचे
अध्यक्ष दत्तू माळी, उपाध्यक्ष नितीन पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक
सी. डी. पाटील आदी उपस्थित होते. विद्यालयातील उपशिक्षक अविनाश राजपूत
यांनी रिक्षा चालकांना मार्गदर्शक सूचनांचे पालन होणेबाबत आवाहन केले.
यात त्यांनी रिक्षेला सुरक्षा गार्ड बसविणे, साईड ग्लास दुरुस्ती, मर्यादित विद्यार्थी
संख्या, विद्यार्थी वाहतूक असा नामोल्लेख वाहनावर करण्यात यावा तसेच प्रत्येक
वाहनात मोबाईल नंबरसह विद्यार्थी यादी, प्रथमोपचार पेटी  याबाबत सविस्तर
मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी
विकासात रिक्षा चालकांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
घर, शाळा, परिसर या संस्थाचे विद्यार्थी विकासासाठी मोलाचे योगदान असते.
त्याचबरोबर विद्यार्थी किमान एक तास रिक्षा चालकांच्या सहवासात राहतो.
त्याकरिता बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण विद्यार्थी करीत असतो. रिक्षा चालकांनी
आपल्या मुलाप्रमाणे संस्काराचे धडे द्यावेत असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले.
विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतात
शाळेचे व पालकांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले. आभार महेंद्र माळी यांनी मानले.
सभा यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, संदीप चौधरी, जगदीश सोलंकी,
गोपाल न्हावी व शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार, सतिष पाटील,
यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.

वर्ग सजावट स्पर्धा

वर्ग सजावट स्पर्धा 

कृतीयुक्त अध्यापन पध्दती प्रशिक्षण

शिक्षकांसाठी कृतीयुक्त अध्यापन पध्दती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित प्राथमिक विभागाच्या विविध शाखेतील शिक्षकांसाठी कृतीयुक्त अध्यापन पध्दती याबाबत शनिवारी संस्थेच्या मेनबिल्डींग येथील नूतन इमारतीच्या सभागृहात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण वर्ग प्रसंगी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा, कृतीयुक्त अध्यापन पध्दतीचे तज्ञ मार्गदर्शक विवेकानंद ठाकरे, एन.आर.कोळी, मुख्याध्यापक सी. डी. पाटील, गणेश साळुंके, मनोज पाटील, प्रदिप गहिवरे, रवींद्र खोंडे, बी. आर. महाजन, प्रदीप कुलकर्णी, रितेश कुलकर्णी, बापू सोनवणे, आर. टी. भोई, ईश्वर पाटील, सय्यद इफ्तेखार, आर. व्ही. सूर्यवंशी, क्राती जाधव, गोपाल पाटील, महेंद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्गात संस्थेतील  प्राथमिक विभागाच्या सतरा शाखांचे दिडशे शिक्षकांनी लाभ घेतला. शैक्षणिक वर्षात संस्थेतील शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष आ.अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल,नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रेरणेने संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  वर्षभरात विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात बाल मानसशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन, शालेय शिस्त,शैक्षणिक साहित्य निर्मिती, ई लर्निंग, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सोप्या पद्धतीने गणित अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, वर्कशीट नियोजन आदी विषयावर संस्थेतील शिक्षकांना तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. संस्थेने वर्षभराचे प्रशिक्षण कॅलेंडर तयार केले असून त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे संस्थचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांना सांगितले. अजून वेगळ्या विषयावर मार्गदर्शन हवे असल्यास शिक्षकांनी नमूद करावे तसे मार्गदर्शन वा प्रशिक्षण तज्ञांकडून करण्यास संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी उपशिक्षक महेंद्र माळी,योगेश बागुल, जगदीश धनगर, संदीप चौधरी, तुळशीराम पावरा यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले.



शालेय स्पर्धा पूर्वतयारी

शालेय स्पर्धा पूर्वतयारी 


आज दिनांक 25/07/2019 वार गुरुवार रोजी आर. सी. पटेल मराठी प्राथमिक
शाळा शिरपूर या शाळेत शालेय स्पर्धा पूर्वतयारी अंतर्गत मम्मीजी क्रीडा स्पर्धेमध्ये
समाविष्ट असणाऱ्या विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडाप्रकारांतील स्पर्धक
विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. इयत्ता पहिली दुसरी यांचा लहान गट व इयत्ता
तिसरी चौथी यांचा मोठा गट याप्रमाणे गटनिहाय स्पर्धा घेण्यात आल्या.
यात 100 मीटर धावणे, 50 मीटर लंगडी, दोरी उडी, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ,
खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, लिंबू चमचा शर्यत, गोणपाट शर्यत, तीन पायांची शर्यत,
बादलीत चेंडू टाकने या स्पर्धांचा समावेश होता. क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची
निवड करून त्यांच्यातील क्रीडा कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे कसे विकसित
होतील या दृष्टीने या प्राथमिक निवड फेरीचे आयोजन शाळेकडून करण्यात आले
होते. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मेहनत घेतली. यावेळी
“खेळ ही जीवनाची संजीवनी आहे” , अभ्यासाबरोबर खेळांना सुद्धा खूप
महत्त्वाचे स्थान आहे, खेळामुळे शरीर निरोगी बनते असा संदेश मुख्याध्यापकांनी
विद्यार्थ्यांना दिला.

क्षेत्रभेट - पोस्टऑफिस

क्षेत्रभेट - पोस्टऑफिस 

आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आज दिनांक 24/07/2019  वार बुधवार रोजी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता चौथी मधील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शिरपूर शहरातील मार्केट यार्ड जवळील पोस्ट ऑफिस च्या मुख्य शाखेत नेण्यात आले. पोस्टाचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना झाला पाहिजे यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी पोस्टात चालणाऱ्या विविध कामांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. पोस्टात पत्रव्यवहार कसा होतो, मनीऑर्डर कशी पाठवली जाते, पत्र व पाकिटांचे वितरण कसे केले जाते, साहित्याची देवघेव करणे, आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मधील माहितीत बदल करणे इत्यादी पोस्टातील विविध कामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी
‘मी पोस्टात का आलो होतो?’
याबाबतचा आपला अनुभव कथन केला. ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी व अधिकारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

पालक शिक्षक सहविचार सभा

पालक शिक्षक सहविचार सभा 

पालक व शिक्षक सहविचार सभा आज दिनांक १८/०७/२०१९ वार गुरुवार रोजी
आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत ‘पालक व शिक्षक
सहविचार सभेचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे दोनशे पालक
उपस्थित होते.  सहविचार सभेला पालकांचा चांगलाच सकारात्मक प्रतिसाद
मिळाला. शाळेतील वर्ग शिक्षकांनी पालकांना वर्गात राबवित असलेल्या
उपक्रमाबाबत माहिती सांगून वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच
पालकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक यांचेही
मार्गदर्शन मोलाचे होते. पालक शिक्षक सहविचार सभेमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा
करण्यात आली.


1) विद्यार्थ्यांची शालेय डायरी दररोज तपासणी करणे.
2) अभ्यास झाल्यानंतरच डायरीवर पालकांनी सही करणे.
3) विद्यार्थ्यांकडून मोठ्याने (प्रकट) वाचन करून घेणे.
4) शालेय वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांच्या दप्तरात वह्या पाठविणे.
5) विद्यार्थ्यांच्या डब्यात बाहेरील खाद्यपदार्थ पाठवू नयेत. (उदा. चिवडा, कुरकुरे,


चिप्स) भाजी पोळीला प्राधान्य द्यावे.
6) पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासबाबत काही अडचणी असतील तर फोन करू

न किंवा व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून शिक्षकांशी संपर्क करून त्या दूर

कराव्यात.
8) शाळेत शिक्षकांच्या भेटीचा वार शनिवार राहील.
7) विद्यार्थ्यांना घरी दिलेल्या ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेऊन फोटो किंवा


व्हिडिओ ग्रुपला टाकावेत.
8) विद्यार्थ्यांचा शालेय गणवेश स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
9) शालेय शिस्तीबाबत सर्वांनी जागरूकता बाळगावी. (शालेय वेळ, बूट, मोजे,

बेल्ट, ओळखपत्र, मुलींच्या डोक्यावरील बेल्ट इ.)

10) वेळोवेळी दिलेल्या ऑनलाइन टेस्ट विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्याव्यात.
11) विद्यार्थ्यांशी बोलताना सकारात्मक भाषेचा वापर करावा.

‘आषाढी एकादशी वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडी ’’

आषाढी एकादशी वृक्ष दिंडी  ग्रंथ दिंडी ’’

शिरपूर येथील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपर येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे, माजी नगरसेवक दिलीप बोरसे, शालेय परिवहन समिती सदस्य दत्तू माळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील आदी उपस्थित होते. शुभांगी बाविस्कर यांनी आषाढी एकादशी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयातील इयत्ता चौथी वर्गाचे वर्गशिक्षक संदीप चौधरी, गजेंद्र जाधव, जगदीश धनगर, गोपाल न्हावी यांनी चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचा 'वृक्षमित्र' गृप तयार करून "जागा तुमची रोपटे आमचे" या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. आदर्शनगर,सुभाष कॉलनी परिसरात कॉलनीतील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घरमालकाला देण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरासमोर लिंब, गुलमोहर, सप्तपर्णी आदी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आषाढी एकादशी निमित्ताने बालवाडी ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा धारण करून वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन करणे आदी बाबतीत बॅनर व जयघोषाने परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले. आभार जगदीश धनगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगिता चव्हाण, अर्चना जोशी, शुभांगी बाविस्कर, व्ही. डी. तांबोळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी संदीप पाटील, सागर पवार,सतिष पाटील यांनी परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिवस 
आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज, शिरपूर करवंद नाका याठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता चौथी मधील सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. योग गुरूंनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची आसने व त्यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये योगा विषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आले. आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या प्रशस्त मैदानात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, 3 July 2019

शाळा शुभारंभ

शाळा शुभारंभ

          शिरपूर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपर शाखेत शाळा शुभारंभ दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी संचालक कमलकिशोर भंडारी, शिक्षण विस्तार अधिकारी जी.पी.कुमावत,नगरसेविका संगीताताई देवरे, छायाताई ईशी,आशाताई बागुल,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे,माजी नगरसेवक दिलीप बोरसे,पालक प्रतिनिधी टी. एन.जाधव, मानसिंग राजपूत, उज्ज्वला गिरासे, मुख्याध्यापक गणेश साळुंके,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. 

शाळा शुभारंभ प्रसंगी नवागतांचे सनई चौघडे वाजवून मिरवणूक काढण्यात आली. इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी नवागत बालकांचे औक्षण करून स्वागत केले. बालचिमुरड्यांना आवडणारे मिकी माऊस ही गोड जोडी स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावरच सकाळी पावणेसात वाजता सज्ज होती. शाळेच्या पहिल्या दिवशी एवढी मजा पाहून नवागत बालके अगदी आंनदाने हुरळून गेली. 
औपचारिक कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  बालवाडी चार वर्गांचे स्वतंत्र चार झाडे लावण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सदर वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण पध्दतीत बदल व्हावा या दृष्टीने डिजिटल वर्गांचे द्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थी उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले. आभार गजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.