आपत्ती व्यवस्थापन
आज दिनांक 06/10/2017 वार शुक्रवार रोजी आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेत आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात वाघाडी आश्रम शाळेचे प्रा. श्री. कैलास पाटील सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. पूर, भूकंप, सुनामी, वीज कोसळणे, गारा, वादळ, पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास काय करावे, कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.विद्यार्थ्यांचे वय जरी लहान असले तरीही घाबरून न जाता त्यांनी आपत्ती कोसळल्यावर सावधानता बाळगली तर ते इतरांचे प्राण कसे वाचवू शकतात याची उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली. आपत्ती काळात कोणत्या क्रमांकाचा आधार घेवून तात्काळ पोलिस किंवा तत्सम व्यक्तींशी संवाद साधून आपण इतरांचे प्राण वाचवू शकतो याची जाणीव विद्यार्थ्यांना करण्यात आली. घरात वीज स्वयंपाकाचा गॅस यापासून सावधगिरी कशी बाळगावी याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. काही कारणास्तव आग लागल्यावर ती कशी विझवावी, अग्नी बंबांचा वापर कशाप्रकारे करतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. भूकंपासारख्या आपत्तीत आपला स्वतःचा बचाव कसा करावा, तात्काळ मोकळ्या जागेत कसे जावे तसे करणे शक्य न झाल्यास टेबला सारख्या आडोशाखाली पटकन कसे जावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन प्राध्यापक कैलास पाटील सर यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन या कार्यक्रमासाठी एच. आर. पटेल शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश साळुंखे सर, आर. सी. पटेल मराठी प्राथ. शाळा रामसिंग नगर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र खोंडे सर तसेच आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.